मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येइल.
तसेच मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ;
महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त आपली भावना या वेळी व्यक्त केली .







