महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील शाळा, अंगणवाडी, पुल, रस्ते यांची अवस्था अतिशय खराब आहे, याकडे देखील राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे.
राज्यातील अनेक ठिकाणी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या यांच्या इमारती दुरुस्त करणे गरजेचे आहे. राज्यातील क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी इतरही काही उपाययोजना करता येऊ शकतील. शासनाने शाळांची मैदाने ठिकठाक करावी, तेथे क्रीडासाहित्य उपलब्ध करून द्यावे.
राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी?
मैदान पुढील वर्षी देखील बांधता येऊ शकते. माझी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातील शाळा आणि अंगणवाडी, रस्ते, पुल याच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदानाला विरोध नाही, पण आपले प्राधान्य कोणत्या गोष्टीला असावे याचे चिंतन करणे गरजेचे आहे.