मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.
आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही.
आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे.
नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाही, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाही.
आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत — हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत.
माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का?
कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे.
आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का? मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात ,तिथून काही शिकून येतात का?